रायगड- महाड विन्हेरे नातू नगर रस्त्यावर मध्यरात्री दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला होता. रस्त्यावर पडलेली दरड काढून रस्ता वाहतुकीस मोकळा केला असला तरी पुन्हा पहाटे त्याच ठिकाणी दरड कोसळून हा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे महाड शहराचा विन्हेरे गावाशी संबंध तुटला आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्यानंतर कोकणात जाण्यासाठी पर्यायी म्हणून महाड विन्हेरे रस्त्याचा वापर केला जातो. सध्या दरड काढण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात पावसाने जोरदार सुरुवात झाली असल्याने महाड परिसरात काल पासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे महाड तालुक्यात अनेक भागात पाणीही साचले आहे. अशातच मुंबई-गोवा महामार्ग बंद झाल्यानंतर पर्यायी असलेला महाड विन्हेरे या रस्त्यावर बुधवारी रात्री दरड कोसळली होती. त्यामुळे हा रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक विभागाने तातडीने रस्त्यावर पडलेली दरड काढून रस्ता मोकळा केला होता. मात्र आज पहाटे पुन्हा त्याच ठिकाणी दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.
सार्वजनिक विभाग आणि पोलीस यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली दरड काढण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात महाड, पोलादपूर तालुक्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या परिसरात दरडी कोसळून वाहतूक बंद होण्याच्या घटना पावसाळ्यात वारंवार घडत असतात.