पनवेल - कळंबोलीमध्ये सापडलेल्या बॉम्बसदृष्य वस्तूचा सोमवारी मध्यरात्री खिडुकपाडा परिसरामध्ये स्फोट घडविण्यात आला. सिमेंटच्या बॉक्समध्ये सापडलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, शाळेसमोर बॉम्बसदृष्य वस्तू ठेवणाऱ्याचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे. या चित्रीकरणावरून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेसह मुंबई एटीएसचे पथक या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
कळंबोलीतील सुधागड हायस्कूलच्या समोरील मैदानात एका सिमेंटच्या बॉक्सला घड्याळाला जोडलेल्या 4 वायर जोडलेला 1 बॉक्स आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. या सिमेंटच्या बॉक्सच्या बाजूला काही धारदार शस्त्र आणि खिळे देखील ठोकण्यात आले होते. तसेच या बॉक्समध्ये 12 व्होल्टेजची बॅटरी देखील वापरण्यात आली होती. हे सगळ पाहून तपासणीसाठी दाखल झालेल्या बॉम्ब स्कॉडने ही वस्तू टाईम बॉम्ब असण्याची शक्यता वर्तवत ही वस्तू खिडुकपाडा परिसरात नेऊन रात्री निकामी केली होती. त्यानंतर या बॉक्समध्ये कोणता शस्त्रसाठा वापरण्यात आला होता का? हे पाहण्यासाठी मध्यरात्री 2 च्या सुमारास खिडुकपाडा परिसरातच स्फोटके वापरून हा सीमेंटचा बॉक्स तोडण्यात आला. त्यानंतर सिमेंटच्या बॉक्सचे तुकडे जमा करून ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे हा टाईम बॉम्ब होता की? कुणाचा खोडसाळपणा होता, हे लवकरच लॅबमधून येणाऱ्या अहवालातून उघड होणार आहे.
दरम्यान, हा सिमेंटचा ब्लॉक फोडण्यासाठी करण्यात आलेल्या स्फोटाच्या आवाजामुळे शाळेबाहेर सापडलेल्या त्या बॉम्बसदृश वस्तूचाच स्फोट झाल्याच्या अफवा परिसरात पसरल्या होत्या. मंगळवारी दुपारी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख देवेन भारती यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासोबत गोपनीय बैठक घेतली.
पोलिसांच्या तपासात रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास टोपी घातलेल्या एका व्यक्तीने ती हातगाडी त्या ठिकाणी ठेवल्याचे समोर आले. या आरोपीने निळ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. हा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याद्वारे सदर व्यक्तीचा शोध सुरू आहे. चित्रीकरणामध्ये संबंधीत आरोपीने डोक्यावर टोपी घातली आहे. स्वत:चा चेहरा कॅमेऱ्यामध्ये येणार नाही याची काळजी त्याने घेतली आहे. पोलिसांनी सदर व्यक्ती ज्या रोडने गेली त्या रोडवरील सर्व कॅमेऱ्यांची सीसीटिव्ही तपासण्यास सुरवात केली असून लवकरच आरोपी हाती लागेल अशी माहिती सूत्रांनी दिली.