रायगड - हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाने सुरू होते. यानिमित्ताने आज (शनिवार) रायगडात ठिकठिकाणी शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत पारंपारिक वेशभुषेसह, आरोग्य, पर्यावरणासह महामानवाचे देखावे सादर करण्यात आले. ही यात्रा अलिबागहून नरेंद्र महाराज यांच्या भक्तांनी शोभायात्रा ढोल ताशांच्या गजरात काढली. हिंदू नववर्षाची सुरुवात ही शोभायात्रा काढून करण्याची परंपरा अनेक वर्षे रायगडकर करीत असतात.
शहरातील महेश टॉकीज येथून शोभयात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत गुढी व कलश घेऊन महिला वर्ग सामील झाले होते. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राम सीता, लक्ष्मण, राणी लक्ष्मीबाई, वासुदेव, याचे जिवंत देखावे यानिमित्ताने सादर करण्यात आले होते. त्याचबरोबर खालू बाजा, ढोल ताशे, लेझीम पथक, भजन बोलत सारेजण नाचण्यात दंग झाले होते. कोळी नृत्यावरही तरुणीचे पाय थिरकत होते. तसेच रक्तदान करण्याचा संदेश, जागतिक तापमानाबाबत संदेशचे फलक या शोभायात्रेत दिसत होते.
शोभा यात्रा अलिबाग शहरात फिरुन समुद्र किनारी या यात्रेचे विसर्जन झाले. गुढी पाडव्यानिमित काढलेल्या या शोभा यात्रेने सारे वातावरण हे भगवेमय व चैतन्यमय झाले होते. तसेच राम मंदिर येथूनही शहरातील नागरिकांनी शोभा यात्रेचे आयोजन केले होते.