रायगड- जिल्ह्यात रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. जिल्ह्यात सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. अलिबाग शहर हे सुद्धा पहिल्यांदाच पाण्याखाली गेले असल्याने दुकानदांरासह, मच्छिमार, नागरिकांचे हाल झाले आहेत. अलिबाग तालुक्यात 331 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे अलिबागमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
अलिबाग शहरात पीएनपी नगर, रामनाथ, शासकीय वसाहत, कोळीवाडा, श्रीबाग, चेंढरे या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अलिबाग शहरात जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. शहरातील अनेक भागात कमरेपर्यंत पाणी साचले आहे. बाजारपेठेतील दुकानात आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. शहरातील मासळी बाजारातही पाणी शिरल्याने कोळी बांधवांनी ठेवलेले थर्माकोल कॅरेट पाण्याबरोबर वाहून जात होते. त्यामुळे कोळी बांधवांचे नुकसान झाले आहे. तर बाजारपेठेत पाणी घुसल्याने दुकानांचेही नुकसान झाले आहे. अलिबाग शहरात पहिल्यांदाच एवढी पुरमय परिस्थिती निर्माण झाली असल्याचे म्हटले जात आहे.
शहरातील वाहतूकही पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने फिरवली आहे. तर शहरात पाणी साचल्याने अनेक नागरिकांनी पाणी पाहण्यास गर्दी केली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती.