रायगड - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम. एस. कलबुर्गी, पत्रकार गौरीलंकेश यांच्या हत्येच्या तपासामध्ये दिरंगाई होत आहे. या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती रायगड शाखा, समविचारी पक्ष व संघटनेतर्फे आज (मंगळवारी) अलिबाग येथे 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले.
यामध्ये अलिबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या संघटनांतर्फे विविध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या खुनाच्या कटात सनातन संस्था व हिंदू जनजागरण समिती कार्यकर्त्यांची नावे समोर आली आहेत. या घटनेला आज 6 वर्षे पूर्ण झाली. मात्र, तरीही तपास योग्यरितीने होत नाही. म्हणून सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, समितीचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, जिल्हाध्यक्ष यशवंत गायकवाड, राज्य सहकार्यवाह आरती नाईक व तुकाराम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष निर्मला फुलगावकर, जिल्हा प्रधान सचिव महेंद्र नाईक व निलेश घरत आणि अलिबाग शाखा अध्यक्ष शुभांगी जोगळेकर यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तीन वर्षांपूर्वी वीरेंद्र तावडेला अटक झाली आहे. तसेच वर्षभरापूर्वी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना अटक झाली. मात्र, तरीही पुढील तपासकामात तपास यंत्रणांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याप्रकरणी सखोल तपास करून कट रचणाऱ्या आणि कटाची प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना समोर आणावे, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली. गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सनातन व हिंदू जनजागरण समिती या संस्थाची नावे पुढे आली आहेत. या संस्थाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.