रायगड - कर्जत तालुका आणि रायगड जिल्ह्याचे शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी वाडीमधील सुरेश भला या आदिवासी तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. या तरुणाच्या कुटुंबाला कर्जत आणि मुरबाड तालुक्यातील आदिवासी समाजाने थोडे थोडे पैसे जमा करून 45 हजार रुपये या तरुणाच्या कुटुंबाला मदत म्हणून दिली आहे.
वीज जोडणी करताना शॉक लागून झाला मृत्यू
सुरेश धर्मा भला हा 20 वर्षीय तरुण विजेचे खांब उभे करणाऱ्या ठेकेदारकडे काम करीत होता. हा तरुण विजेच्या खांबावर चढून वीज वाहिनी जोडण्याचे काम करीत होता. अचानक वीज प्रवाह सुरू झाला आणि विजेचा धक्का लागून सुरेश जमिनीवर कोसळला. दरम्यान, विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. भला कुटुंबात सुरेश हा एकमेव कर्ता तरुण होता आणि त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे या कूटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
सुरेशच्या निधनाने कुटुंबावर आली होती उपासमारीची वेळ
सुरेश भला याचे वडील मजुरी करीत असून, त्याची बहीण शिक्षण घेत आह. मात्र, सुरेश भला याच्या मृत्यूमुळे त्या कुटुंबाच्या समोर आर्थिक प्रश्न समोर उभा राहिला आहे. या कुटुंबाबतची माहिती कर्जत आणि मुरबाड तालुक्यातील आदिवासी समाजाला समजली. त्यानंतर हनुमान पोकळा यांनी आदिवासी समाजाच्या सोशल मीडिया ग्रुपवर आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन दोन्ही तालुक्यातील आदिवासी समाजाने लॉकडाउनमुळे कामधंदा नसतानाही आपल्या परीने जे शक्य आहे, तेवढी मदत गोळा केली. यामधून सुमारे 45 हराज रक्कम गोळा झाली. ही रक्कम कर्जत, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, नाशिक, पुणे विभागातील आदिवासी गोळा मदत केली आहे. या सर्वांच्या माध्यमातून गोळा झालेली ही मदत सुरेश भला यांच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाला देण्यात आली. हातावरच पोट असलेल्या समाजाने सामाजिक भान जपल्याने सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.