रायगड - चवदार तळे सत्याग्रहाच्या 93 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमावर कोरोनाचा परीणाम दिसुन आला. प्रतीवर्षी ज्या चवदार तळ्यावर हजारोंचा जनसमुदाय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतो, ते चवदार तळे आज (शुक्रवार) सत्याग्रहाच्या 93 व्या वर्धापन दिनी निर्मनुष्य असल्याचे दिसून आले. कोरोना विषाणूची लागण कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांना होऊ नये, यासाठी वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा... कोरोना कहर : जगभरात मागील २४ तासांत १ हजार ९७ जणांचा मृत्यू; चीनपेक्षा इटलीत मृतांची संख्या जास्त
20 मार्च 1927 ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चवदार तळ्याचे ओंजळ भर पाणी पिऊन ते पाणी सर्वांसाठी खुले केले होते. हा दिवस महाड (रायगड) सहित संपुर्ण देशात चवदार तळे सत्याग्रह दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. संपुर्ण देशभरातुन हजारोंच्या संख्येत आंबेडकरी अनुयायी महाड येथे येतात. आंबेडकरी विचारांची पुस्तके, भगवान गौतम बुद्ध, बाबासाहेबांच्या मुर्ती, खाद्यपदार्थांची दुकाने यामुळे येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चवदार तळ्यावर गर्दी झाली नाही.
कोरोनाची सध्या दहशत असून गर्दीच्या ठिकाणी या विषाणूचा धोका जास्त आहे. त्यामुळे 20 मार्च रोजी होणारा चवदार तळे सत्याग्रह वर्धापनदिन कार्यक्रम प्रशासनाने आरोग्य सुरक्षेसाठी रद्द केला होता. त्यामुळे भीम अनुयायांनीही शासनाचे आवाहन मानून गर्दी केली नाही.