रायगड - जिल्ह्यातील पनवेलमध्ये खांदेश्वर स्टेशनसमोर नव्याने होत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेला विरोध करणाऱ्या कामोठेकरांनी रविवारी थेट मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी सिडकोविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकल्पाविरोधात परिसरातील नागरिक एकवटले असून नागरी हक्क समितीची स्थापना करत सिडकोच्या विरोधात लढा देत आहेत.
हेही वाचा... नागरिकत्व कायदा न्यायालयात टिकल्यानंतर राज्यात लागू करण्याविषयी विचार करू - उद्धव ठाकरे
खांदेश्वर स्टेशनसमोर असलेल्या जागेवर नियोजित बस टर्मिनलचे आरक्षण बदलून सिडको महामंडळाने तळमजल्यावर बस टर्मिनल आणि त्यावर पंतप्रधान आवास योजनेतील घरे असा निर्णय घेतलाय. याच धर्तीवर खांदेश्वर रेल्वे स्थानकाबाहेर सध्या ठेकेदाराने विविध ठिकाणी लोखंडी पत्रे लावले आहेत. रेल्वे स्थानकाला लागून रहिवासी प्रकल्प आल्यास स्थानकाबाहेरील मोकळेपणा संपुष्टात येईल, अशी भीती या रहिवाशांना वाटू लागली आहे.
हेही वाचा... 'गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना माना, ही कसली सौदेबाजी?'
मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरदेखील हा प्रकार सुरू असल्यामुळे वेगवेगळ्या संस्थामध्ये सामाजिक काम करणाऱ्या नागरिकांनी रविवारी मोर्चा काढला. हा प्रकल्प बंद करा, सिडको प्रशासनाचा निषेध असो, अशा घोषणा यावेळी नागरीकांनी दिल्या आहेत. कामोठेतील सेक्टर 21 मधील सामाजिक केंद्राजवळुन या मोर्चाला सुरवात करण्यात आली. ज्या भूखंडावर हा प्रकल्प होत आहे, तो भूखंड पार्किंग आणि खेळण्याच्या मैदानासाठी राखीव असल्याने जर या जागेवरच टॉवर बांधले तर आम्ही पार्किंग कुठे करायची आणि मैदाने कुठे शोधायची? असा सवाल यावेळी कामोठेकरांनी केला. या मोर्चामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर लहान मुले देखील सहभागी झाले होते. यावेळी या चिमुकल्यांनी देखील आपल्या बोबड्या आवाजात जागेवर होणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेला विरोध दर्शविला आणि आम्ही खेळायचं कुठे? असा प्रश्न केला.
हेही वाचा... मोतीलाल नेहरू यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पायल रोहतगीला अटक
काही नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून बेदखल झाल्यामुळे नागरिकांनी या प्रकाराची तक्रार थेट मुख्यमंत्राकडे केली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील मोकळी जागा वाचवावी, संबंधित भूखंड वाहतुकीच्या भविष्यातील विस्तारासाठी ठेवण्यात यावा, नागरिकांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तरी योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कामोठेकरांनी केली.