रायगड - राज्याचा मुख्यमंत्री हा अलिबागकर ठरवणार ही बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केली होती. राज्यातील महिनाभराच्या घडामोडीत मूळचे अलिबागचे असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या विरोधात किल्ला लढवून अखेर महाविकास आघाडीचे सरकार बनविण्यात सिहांचा वाटा उचलला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होणार आहेत.
हेही वाचा - अघोरी प्रयत्न करून सुद्धा भाजपला मुख्यमंत्री लादता आला नाही - संजय राऊत
24 ऑक्टोबरला राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जनतेने शिवसेना भाजपला जनमत दिले. जनतेने जनमत दिल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरला. मात्र, भाजपने सेनेला मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिल्याने युती तुटली. परिणामी संजय राऊत यांनी भाजपवर महिनाभर हल्ला चढवत मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार, हे ठामपणे सांगत होते. त्यानंतर अनेक घडामोडी घडून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
हेही वाचा - 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शपथविधी शिवतीर्थावर'
भाजप आणि अजित पवार यांच्या या खेळीने राज्यातील राजकारण पुन्हा बदलले. मात्र, अडीच दिवसात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. राज्यातील सत्तेचे समीकरण जुळविण्यात राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन भिन्न विचारांच्या पक्षांची मोट बांधण्याचे काम एका अर्थाने राऊत यांनी केले.
हेही वाचा - राज्यपालांच्या साक्षीने संविधानाची हत्या - संजय राऊत
मुळचे अलिबागचे असलेले राऊत यांच्या आक्रमकतेमुळे भाजप सत्तेपासून दूर राहिला आहे. त्यामुळे अलिबागकर असलेल्या संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे यांच्या रूपाने राज्याला मुख्यमंत्री लाभला आहे, असे म्हणता येईल.