रायगड - म्हसळा तालुक्यातील कोळवट, भापट, कोकबल हा रस्ता दहा लाख खर्च करून बनवलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. शाखा अभियंता आणि ठेकेदार याच्या चुकीच्या कामामुळे रस्त्याचे पैसे वाया गेले. याबाबत म्हसळा पंचायत समिती कार्यालयात सुरू असलेल्या बैठकी दरम्यान माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी शाखा अभियंता संजय डोंगरे यांना जाब विचारून याच्या तोंडाला शाई फासली आहे.
रस्ता गेला एका दिवसात वाहून -
म्हसळा तालुक्यातील विविध भागांतील रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. मुख्य रस्त्याला गावांना जोडण्यासाठी रस्त्याची कामे सुरू आहेत. कोळवट, भापट, कोकबल या ४00 मीटर डांबरीकरण रस्त्यासाठी ९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. 3 जून रोजी हा रस्ता ठेकेदाराने पावसाच्या आधी पूर्ण केला. ४ जून रोजी आलेल्या पावसात हा रस्ता वाहून गेला. बऱ्याच वर्षाने हा रस्ता करण्यात आला होता. रस्ता ठेकेदाराने निकृष्ट कामामुळे आणि अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे पहिल्याच पावसात वाहून गेला.
अधिकाऱ्याला फासली शाई -
रस्त्याच्या निकृष्ठ कामाबाबत म्हसळा शिवसेनेतर्फे सोमवारी आंदोलन छेडण्यात आले होते. रस्त्याच्या या दुरावस्थेबाबत पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. यावेळी संबंधित अधिकारी बोलावले नसल्याचा आरोप शिवसेनेने केला. म्हसळा तालुक्याचे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नंदू शिर्के यांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात शाखा अभियंता संजय डोंगरे यांना रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत जाब विचारला. यावेळी त्याच्या तोंडाला शिर्के यांनी शाई फासली. ठेकेदार याला निकृष्ट काम केल्याबद्दल काळ्या यादीत टाकण्याची मागणीही यावेळी करण्याचे आली.
कर्मचारी युनियनतर्फे काळी फिती लावून निषेध -
शाखा अभियंता संजय डोंगरे याच्यावर शाई प्रकरणाबाबत रायगड जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे जाहीर निषेध व्यक्त केला आहे. आज ८ जून रोजी कार्यालयात काळी फिती लावून निषेध व्यक्त केला जाणार आहे.
हेही वाचा - रायगड: वडखळचे सरपंच राजेश मोकल यांचा असंख्य कार्यकर्त्यांसहित भाजपचा राजीनामा