खालापूर (रायगड) - मोदी है, तो महंगाई है, असे म्हणत केंद्रातील मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आंदोलन केले. कर्जत तालुक्यातील महिला आघाडीकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीने उंच्चाक गाठला आहे. या भाववाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर होत आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या भाववाढ व महागाईविरोधात आंदोलन छेडले आहे.
वास्तविक पाहता हे आंदोलन रस्त्यावर उतरून होणे गरजेचे होते. मात्र, कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळून सोशल मीडियावर हे आंदोलन महिला आघाडीच्या वतीने करण्यात आल्याचे कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष ॲड. रंजना धुळे यांनी सांगितले. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा पुजा सुर्वे, कर्जत नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका तसेच शहराध्यक्षा पुष्पा दगडे, नगरसेविका सुवर्णा नीलढेसह राष्ट्रवादीच्या महिला आघाडी वर्गाने सहभाग नोंदवला होता.