रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामीसह दोन जणांना दिलेल्या न्यायालयीन कोठडी विरोधात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दीड महिन्यापासून ही सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश एम. जे. मल्लशेट्टी याच्या न्यायालयात सुरू आहे. आज पुनर्निरीक्षण याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
5 नोव्हेबरला दाखल केली होती याचिका
4 नोव्हेबर रोजी अर्णब गोस्वामीसह नितेश सरडा, फिरोज शेख याना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी मुंबई येथून अटक केली होती. तिघांनाही अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी याच्या न्यायालयात हजर केले असता, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयाच्या या निकालाविरोधात रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात 5 नोव्हेबरला पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने तिघांना दिला आहे अंतरिम जामीन-
अर्णब गोस्वामी याने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने तिघांचा अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या पोलिसांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवर अद्याप निकाल न्यायालयाने दिलेला नाही. त्यामुळे आज न्यायालय या याचिकेवर काय निर्णय देणार याकडे लक्ष राहणार आहे.
7 जानेवारीला अर्णबसह दोघांना राहावे लागणार न्यायालयात उपस्थित-
रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णबसह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषारोप पत्र मुख्य न्यायदंडाधिकारी याच्या न्यायलायत दाखल केले आहे. न्यायालयाने या प्रकरणात अर्णबसह नितेश सरडा, फिरोज शेख याना 7 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी केले आहे. त्यामुळे तिघांनाही न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.