रायगड - रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडचे ड्रोनच्या सहाय्याने एरियल सर्व्हेचे काम पुर्ण झाले आहे. महाराष्ट्र रिमोट सेनसिंग अप्लिकेशन सेन्टर या राज्य शासनाच्या संस्थेची मदत घेऊन हा सर्व्हे करण्यात आला आहे. रायगड किल्ला आणि परिसरातील 21 गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी या सर्व्हेची मदत होणार असल्याची माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाडमध्ये पत्रकार परीषदेत दिली. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले उपस्थित होते.
रायगडचा ड्रोनच्या सहाय्याने एरियल सर्व्हे -
रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडचा एरियल सर्व्हे करण्यात आला आहे. त्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेनसिंग अप्लिकेशन सेन्टर या राज्य शासनाच्या संस्थेची मदत घेण्यात आली आहे. रायगड किल्ला आणि परिसरातील 21 गावांची ड्रोनच्या माध्यमातून 50 बाय 50 सेंटीमीटर आकाराची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. त्यातून रायगडसह आजूबाजूच्या गावातील पाणी, वीज, रस्ते, पोल, विजेचे खांब, घरे, नदी, ओढे याची माहिती संकलित करण्यात आली आहे. यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आली आहे.
किल्ले संवर्धनात पहिल्यांदाच तंत्रज्ञानाचा वापर -
यासंदर्भातील अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे. या सर्व्हेमुळे या परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात मोठी मदत होणार आहे. राज्यात किल्ले संवर्धनात पहिल्यांदाच अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अशी माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी दिली.