रायगड - जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीने 2 दिवसात 9 जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये 8 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर एकाचा शोध आणखी सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे दगावणाऱ्यांची संख्या 16 वर पोहोचली आहे.
यश म्हात्रे (वय - 19, अलिबाग), राजेंद्र विश्राम शेलार (25, पोलादपूर), युवराज धीरज वालेंद्र (6, माथेरान), विवेक बबन भालेराव (18, कर्जत), चेतन यशवंत मोरे (30, पनवेल), परशुराम विचारे (नागोठणे), रवी चव्हाण (38, मुंबई), आशिष शेपुडे (40, रोहा) ब्रिजेश यादव (20, उरण) हे 9 जण नदी, तलाव, मोरीत बुडाले आहेत.
रायगड जिल्ह्यात 26 आणि 27 जुलैला सरासरी 350 मिलीमिटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील काही भागात 600 मिलिमिटरच्या आसपास पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात ठिकठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये 9 जण पाण्यामध्ये वाहून गेले. यामधील 8 जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे.
त्याबरोबरच उरण पागोटे येथे तलावात आज 29 जुलै रोजी सकाळी ब्रिजेश लाला यादव (वय 20) हा तलावात आंघोळीला गेला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह स्थानिक व पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. त्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या इतर घटनेमुळे जून महिन्यात आतापर्यंत एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील तिघांना सरकारकडून 12 लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे.