पुणे - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, वर्क फ्रॉम होमच्या दरम्यान कंपनीला अपेक्षेपेक्षाही चांगले काम करुन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहेत, अशी भावना 'मरक्स' या आयटी कंपनीत काम करणाऱ्या अलमदार सय्यद यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा... कोरोनाचा असाही परिणाम; आता मद्य कंपनी करणार सॅनिटायझरची निर्मिती
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपनीने आम्हाला वर्क फ्रॉम होम दिले आहे. वर्क फ्रॉम होम करताना जसे कंपनीत काम होत होते, तसे होत नाही. मात्र, कंपनीने आमच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलले असल्याने त्याचा आनंद होत आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त काम करून कंपनीला अपेक्षित असलेल्या कामापेक्षा अधिक समर्पित भावनेने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.
वर्क फ्रॉम होम करत असताना घरातील देखील काही कामे करावे लागतात. मात्र, ऑफिसच्या वेळेपेक्षा अधिक वेळ देऊन आम्ही ऑफिसची कामे करत असल्याची भावना अलमदार सय्यद यांनी व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 100 हुन जास्त झाली आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना 31 मार्च नव्हे तर त्याहून पुढे काही दिवस घरी राहुनच काम करावे लागणार आहे, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.