बारामती : बारामतीतील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय बारामतीसह इतर जिल्ह्यातील महिलांसाठीही वरदान ठरत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त पाहुया या रुग्णालयाचा 'ईटीव्ही भारत ने' घेतलेला खास आढावा...
अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज रुग्णालय
पूर्णपणे महिलांसाठीच असलेले अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असे विशेष रुग्णालय बारामतीत 2015 मध्ये उभारण्यात आले. 100 खाटांच्या या रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा हजारो महिलांना लाभ होत आहे. वर्षाकाठी या रुग्णालयात 2 हजारहून अधिक गर्भवती माता विनामूल्य प्रसुतीचा लाभ घेत आहेत. एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०२१ या पाच वर्षांच्या काळात या रुग्णालयात १ लाख ८३ हजार ४७४ गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. तर या कालावधीत एकूण १८ हजार ५६३ गर्भवती मातांची प्रसूती करण्यात आली. यामध्ये १२ हजार ८३ स्वभाविक तर ६ हजार ४८० सिझेरीयन प्रसूतीचा समावेश आहे. विशेष म्हणजे सिझेरीयनच्या अनेक केसेस नॉर्मल करण्यात या रुग्णालयातील डॉक्टर यशस्वी ठरले आहेत. शहरी, ग्रामीण आणि दारिद्र रेषेखालील कुटुंबांना बारामतीचे महिला ग्रामीण रुग्णालय संजीवनी ठरत आहे.
केवळ दहा रुपयांत मिळतात या सुविधा
खाजगी रुग्णालयांमध्ये नॉर्मल प्रसुतीसाठी आठ ते दहा हजार रुपये तर सिझेरीयनसाठी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो. एवढी मोठी रक्कम उभी करणे सर्वसामान्यांना कठीण जाते. मात्र या रुग्णालयात केवळ दहा रुपयांच्या केस पेपरमध्ये येथे दाखल होणाऱ्या गर्भवती मातांवर मोफत उपचार केले जातात. जास्तीत जास्त नॉर्मल प्रसूती कशी होईल यासाठी या रुग्णालयात विशेष प्रयत्न केले जातात. त्यामुळे अनेक गर्भवती माता खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही प्रसूतीसाठी येथे दाखल होत असल्याचे येथील डॉक्टर सांगतात.
बारामतीसह शेजारील तालुक्यातील महिलांना लाभ
बारामतीच्या या महिला ग्रामीण रुग्णालयात पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदरसह शेजारील तालुक्यातील अनेक महिला उपचारांसाठी येतात. रुग्णालयातील स्वच्छता, डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांकडून मिळणारी नम्रतेची वागणूक, तसेच नाममात्र शुल्कात विविध तपासण्या, शस्त्रक्रिया व इतर उपचार मोफत दिले जातात. रुग्णांना नेण्या-आणण्याची व खाण्यापिण्याची सोयही अगदी खाजगी रुग्णालयाप्रमाणेच पुरविली जाते. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेण्यास महिला प्राधान्य देतात.
कोरोना काळातही गर्भवती मातांची केली सेवा
टाळेबंदीदरम्यानही या महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलांना योग्य प्रकारे सुविधा देण्यात आल्या. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियम पाळून रुग्णालयाने सेवा सुरू ठेवत गर्भवती माता आणि बालकांच्या नियमित लसीकरणातही खंड पडू दिला नाही. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान नियमित लसीकरण करण्यात आले.