पुणे - कोरोना विषाणू संसर्गाच्या, वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, यंदा आषाढी एकादशीची वारी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारीची परंपरेला खंड पडू नये, यासाठी संतांच्या पादुका बसने पंढरपूरला नेण्यात येत आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका बसने पंढरपूरकडे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रवाना होणार आहेत.
देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा प्रथमच शासनाने पायी पालखी सोहळा रद्द केला. परंतु तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा लक्षात घेऊन शासनाने मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत प्रमुख संताच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यास परवानगी दिली. या पादुका बसने पंढरपूरला घेऊन जाण्यात येत आहेत. आज (दि. 30 जून) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमधून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. या पालखीसोबत संस्थानच्या 20 व्यक्ती आहेत.
दरम्यान, शासनाने प्रत्येक पालखीसोबत 20 व्यक्तींनाच जाण्यासाठी परवानगी दिली आहे. या 20 व्यक्तींची निवड करताना देखील अनेक निर्बंध घातले आहेत. यात परवानगी देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व इतर व्याधी असलेल्या व्यक्तीला सहभागी होता येणार नाही. तसेच पालखी सोहळ्यातील सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी, पोलीस, एसटी बस व सर्व्हीस व्हॅनचे चालक या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी नीरा स्नान पार पडले. यानंतर आज विठूरायांच्या भेटीसाठी तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होणार आहे. या मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - 'कोरोनाशी लढताना विकासकामांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या'