पुणे- दौंड शुगरमध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. सर्व गोष्टींना व चौकशांना आम्ही सामोरे जायला तयार असल्याचे दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे कळत आहे.
हेही वाचा-भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नेत्यांना तपास यंत्रणांकडून टार्गेट- नवाब मलिक
कंपनी कायद्यानुसार कारखान्याची नोंदणी
दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे म्हणाले, की आत्तापर्यंत आम्ही सर्व सहा महिन्यांचा प्राप्तिकर भरलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व गोष्टींना व चौकशांना आम्ही सामोरे जायला तयार आहोत. यंत्रणांना पूर्ण सहकार्य आम्ही करणार आहोत. कारवाई का झाली हे सांगता येणार नाही. दौंड शुगर कारखान्यावर काही प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आले. त्यांना जी काही माहिती हवी आहे, ती माहिती कार्यकारी संचालक देत आहे. कारखाना सुरू होऊन जवळपास १३ वर्ष झाली आहेत. कंपनी कायद्यानुसार रजिस्टरेशनदेखील करण्यात आले आहे.
हेही वाचा-हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका
कारखान्याकडून कराचा वेळेवर भरणा
कारखान्याचे संस्थापक बाळासाहेब जगदाळे यांनी सुरू केलेला हा साखर कारखाना आहे. कारखान्याचा कारभार हा अतिशय पारदर्शक असा आहे. कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार यात होत नाही. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात येतो. चालू वर्षाची एफआरपीदेखील आम्ही दिलेली आहे. तक्रार कोणी केली हे माहीत नाही. परंतु यातून काही निष्पन्न होईल, असे मला वाटत नाही. कारण आम्ही नेहमी कर भरणा केलेला, असेदेखील यावेळी कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
हेही वाचा-कोल्हापुरातील अजित पवारांच्या बहिणीच्या घरासह कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे