पुणे - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या सगळ्या जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांची ही भूमिका मला मान्य नाही. त्यामुळे मी पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे, अशी प्रतिक्रिया वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात आमचे प्रतिनिधी मुकुल पोतदार यांनी लक्ष्मण माने यांच्याशी साधलेला संवाद पाहण्यासाठी क्लिक करा
'ईटीव्ही भारत'शी बोलताना लक्ष्मण माने म्हणाले, वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सगळ्या जागा लढवणार असल्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. त्यानंतर मी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे लोकसभेमध्ये केलेली चूक टाळण्यासाठी समविचारी पक्षांबरोबर युती करण्याची मागणी केली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप त्यांची भूमिका बदललेली नाही. त्यामुळे मी आज माझ्या पदाचा राजीनामा आंबेडकरांकडे सुपूर्द केला आहे.
त्याप्रमाणेच शरद पवार हे मोठे नेते असून, त्यांच्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडल्याचे वृत्त चुकीचे आहे. तसेच पक्षातील कुठल्याही नेत्याशी माझे मतभेद नाहीत. मात्र, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना मदत होईल अशी कुठलीही भूमिका मला मान्य नाही, असेही लक्ष्मण माने यावेळी म्हणाले.