पुणे - वडगाव मावळ परिसरात अज्ञातांनी एकावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी वडगाव पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत. यात मिलिंद मनेरीकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पोटात उजव्या बाजूला तीन तर एक गोळी मानेला घासून गेली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दुचाकीवरून आलेले दोन्ही आरोपी हे फरार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद मधुकर मणेरीकर (वय ५० वर्ष रा तळेगाव दाभाडे) व त्यांचे मित्र चेतन विजय निमकर (वय ५१ वर्ष, रा तळेगाव दाभाडे) हे दोघे गाडीतून तळेगाववरून वाहनगावकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन गाडी थांबवत हांडे पोल्ट्री फार्म कुठे आहे? असे विचारले. तेव्हा, काच खाली घेऊन मिलिंद हे बोलत असताना दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्याच्याजवळील गावठी कट्ट्याने कार चालक मिलिंद मणेरीकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.
त्यापैकी एक मानेला घासून गेली असून, पोटात उजव्या बाजूला तीन गोळ्या लागल्या आहेत. गोळीबार करताच दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहेत. दरम्यान, मिलिंद मनेरीकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून, प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेचा अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.