पुणे - जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. यानंतर फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्ह्यातून अटक केली. संजय बबन काटकर (वय 38, रा. कादवे, ता. वेल्हे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा चिमुरडीच्या घराजवळच राहतो.
हेही वाचा - कात्रज घाटात टाकून दिलेल्या बाळासाठी धावून आली खाकी वर्दीतील माता
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 15 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कुरण खुर्द गावात घरासमोर खेळणार्या दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. वेल्हे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. श्वानपथक व पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी चिमुरडीचा शोध घेत होते. दरम्यान, हवेली तालुक्यातील मालखेड थोपटेवाडी रस्त्यावरील एका पुलाखाली तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. शवविच्छेदन अहवालातून चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपीच्या शोधासाठी अकरा पथके तैनात केली होती.
याप्रकरणी पोलिसांना बबन काटकर या व्यक्तीवर संशय होता. तो रायगड जिल्ह्यातील नाटे येथील एका वीटभट्टीवर लपून बसला असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने बबन काटकर याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने या क्रूर गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करत आहेत.
हेही वाचा - चालू क्रिकेट सामन्यात क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू