पिंपरी-चिंचवड (पुणे) - जिल्ह्यातील मावळ परिसरात वास्तव्यास असणाऱ्या युवा उद्योजिकेने लॉकडाऊन असताना देखील अशा खडतर परिस्थितीवर मात करत कोट्यवधीची उलाढाल केली आहे. शुभांगी दळवी असे या युवा उद्योजिकेचे नाव असून त्यांनी तीन एकर शेतीमध्ये नर्सरीचा व्यवसाय थाटला आहे. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र यावर्षी बाजारपेठा बंद असल्याने ऑनलाइन साईटवरून रोपांची विक्री केली जात आहे. इतर वेळी दुबईमधून त्यांच्याकडील फिलोनॉपसीस ऑर्किड या फुलांच्या रोपांना जास्त मागणी असते.
लग्नानंतर सुरू झाला उद्योजिकेचा प्रवास -
मावळमध्ये शुभांगी यांची नर्सरी असून अगोदर त्यांचे पती ते सांभाळत होते. 1990 सालापासून दळवी कुटुंब हे या क्षेत्रात काम करत आहे. मात्र, नव्वद साली पॉलीहाऊस काय असतं हे शुभांगी यांचे पती पांडुरंग दळवी यांना माहीत नव्हते. 2006 साली त्यांचा विवाह शुभांगी यांच्याशी झाला. दरम्यान, शुभांगी यांचे वडील पॉलीहाऊसशी संबंधित असल्याने त्यांनी यात बदल करण्यास सांगितले. मात्र, पांडुरंग हे इतर व्यवसायात असल्याने त्यांनी ही सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नी शुभांगी यांच्यावर सोपवली. 2010 ला त्यांनी नर्सरीची सर्व सूत्रे हातात घेतली आणि एक युवा उद्योजिका होण्याचा प्रवास शुभांगी यांचा सुरू झाला.
तैवानला जाऊन विशेष प्रशिक्षण -
त्यानंतर अनेक बदल त्यांनी केले, यातून त्यांना वर्षाकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळायचं. पण, काहीतरी वेगळं करण्याची जिद्द शुभांगी यांना स्थिर बसू देत नव्हती. 2016 ला त्यांनी तैवानला जाऊन नर्सरीमध्ये आधुनिक पद्धतीने रोपं कशी बनवायची याचे विशेष प्रशिक्षण घेतले. यात त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असं त्या सांगतात. दरम्यान, सर्व काही सुरळीत चाललं असताना मार्च महिन्यात कोरोनासारखी महामारी अवघ्या जगात पसरली. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाला. शिवाय परराज्यातील कामगार देखील त्याच्यामुळे आपापल्या गावी निघून गेले. याचा मोठा तोटा सहन करावा लागला. मात्र, स्थानिक नागरिकांनी साथ दिली तसेच अनेक नातेवाईकांनी मदत केली.
लॉकडाऊनमध्ये अडीच कोटींची उलाढाल -
आधीच कोरोनामुळे अनेकांकडे काम नव्हते. नर्सरीमुळे त्यांना काम मिळालं आणि दिवसरात्र मेहनत घेत नर्सरी फुलवली. ऑनलाइन साईटवरून अनेक ग्राहकांनी नर्सरीमधील रोपं विकत घेतली आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांनी अडीच कोटींची उलाढाल केली असल्याचे शुभांगी यांनी सांगितलं. इतर वेळी मावळमधील नर्सरीची रोप सातासमुद्रापार जात असल्याचे शुभांगी या आवर्जून सांगतात. सध्या दळवी कुटुंबाचं वर्षाकाठी तीन कोटींचे उत्पन्न हे नर्सरीमधून घेतात.
दुबईसह 'या' देशात फुलांची रोपे पोहचवली जातात -
दुबई, नायजेरिया, मॉरिशस या देशात शुभांगी या नर्सरीची रोपं पाठवतात. त्यामध्ये सर्वात जास्त दुबईमधून फॅलेनोप्सीस ऑर्किड या जातीच्या रोपांना मागणी आहे. 17 ते 22 डिग्री तापमानात ती रोपं जगतात. नर्सरीमध्ये तब्बल 150 जातीची रोपे असून यात आरेका पाम, गोल्डन फर्म, मोगरा, जास्वंद, गुलाब, शेवंती, सदाफुली या जातीच्या रोपांना विशेष मागणी असते.