पुणे - संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची पहिली पायरी आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी होण्यासाठी, गुन्हा दाखल करण्यासाठी यापूर्वी अनेक अर्जही आले. मात्र, आज पूजा चव्हाण यांची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर लवकरच संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होणार असल्याचेही तृप्ती देसाई यांनी यावेळी सांगितले.
भाजपची मागणी -
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वारंवार संजय राठोड यांचे नाव घेतले जात होते. मात्र, ते राजीनामा देत नव्हते. त्यात उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात येत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यामुळे आज अखेर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा - तपास अहवाल येईपर्यंत राठोडांचा राजीनामा घेऊ नका- महंत जितेंद्र महाराज
दरम्यान, सात फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात राज्याचे मंत्री संजय राठोड त्यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, आता संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. तृप्ती देसाई यांनी सांगितल्यानुसार राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.