पुणे - राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदम कडक लॉकडाऊन लागणार की काय या भीतीने पुण्यात काम करणाऱ्या परप्रांतीय नागरिकांनी आपल्या गावाचा रस्ता धरला आहे. राज्यात दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुन्हा जर कडक लॉकडाऊन लागला तर मागच्या वर्षी प्रमाणे अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून आत्तापासूनच हे कामगार आपापल्या गावाला परत निघाले आहेत.
उत्तरेत जाणाऱ्या सर्वच गाड्या फुल -
9 तारखेपासून पुणे ते दनापूर अशी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 30 हून अधिक गाड्या गेल्या आहेत. प्रत्येक ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट असलेल्या फक्त 1 हजार 400 जणांना बसण्याची परवानगी दिली जात आहे. पुणे स्टेशन येथून दरोरोज 130 ते 140 ट्रेन ये-जा करतात. यातील बहुतेक सर्वच गाड्या फुल होऊन जात आहेत. विशेषत: उत्तरेत जाणाऱ्या गाड्यांसाठी जास्त गर्दी होत आहे.
पुन्हा तो त्रास नको -
मागच्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीयांना समस्यांना सामोरे जावे लागले होते. तो भयावह अनुभव पुन्हा आम्हाला नको. आमच्याकडे ना मालक ना प्रशासन कोणीही लक्ष देत नाही. म्हणून आम्ही परत आमच्या गावाला जात आहोत, अशी प्रतिक्रिया काही कामगारांनी दिली.
पुण्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार करतात काम -
पुण्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक काम करतात. बांधकाम विभाग, हॉटेल, मजूरी, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर काम करतात. पुण्यात या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कामगार हे मागच्या लॉकडाऊनमध्ये गेले ते परत आलेच नाही. जे कामगार परत आले होते ते देखील आता परत आपल्या गावाला जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी होत आहे.
पुन्हा अनलॉकमध्ये होऊ शकतो कामगारांचा तुटवडा -
पुण्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार काम करतात. आता हे कामगार मोठ्या संख्येने आपापल्या गावाला परत जात आहेत. जर कोरोनाची स्थिती निवळल्यानंतर हळूहळू सर्व काही सुरू करण्यात आले तर मोठ्या संख्येने कामगारांचा तुटवडा जाणवेल. पहिल्या लॉकडाऊननंतर तर अनेकांनी आपापल्या कामगारांना विशेष वाहन व्यवस्था करून बोलवले होते.