जुन्नर (पुणे) - तालुक्यातील मढ-जुन्नर रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे गणेशखिंड येथे मालावाहु ट्रक जात असताना आज दुपारी अचानक रस्ता खचून ट्रक दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने जीवितहानी टळली, मात्र अपघाताचा थरार अंगावर काटा आणणारा होता.
ट्रकच्या अपघाताचा थरार
जुन्नर तालुक्यातील मढ जुन्नर रस्त्याचे काम बेल्हेकर कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. या कंपनीकडून या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या, मात्र नागरिकांच्या तक्रारीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. आज मात्र बेल्हेकर कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालवाहु ट्रक मढ जुन्नर रस्त्यावरून खडी घेऊन जात असताना गणेशखिंड येथे अचानक रस्ता खचल्याने ट्रक दरीत पलटी झाला. यामध्ये ट्रक चक्काचूर झाला आहे.
राजकीय वरदहस्त
जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील केंद्र व राज्य मार्गाच्या रस्त्यांची कामे बेल्हेकर कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली आहेत. या कंपनीकडून रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होत असून अपघातांची मालिकाच सुरू आहे. मागील सहा महिन्यात तीन अपघाताच्या भीषण घटना घडल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान रस्त्यांच्या कामाच्या ठेकेदारांना राजकीय वरदहस्त मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.