पुणे - आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी१४ तासांपासून बचावकार्य करण्यात आले आहे. यामध्ये एनडीआरएफ जवान, स्थानिक नागरिक, पोलीस, महसूल विभाग या सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. आता रात्रभर मदत कार्य करुन अखेर आज सकाळीसुमारास या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
एनडीआरएफच्या जवानांनी बोअरवेलच्या बाजुने खोदत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र खडकाळ जमीन असल्याने खोदकाम करण्यास अडथळे येत होते. असे अडथळे पार करत या जवानांनी तब्बल १४ तास खडकाशी झुंजत चिमुकल्या रवीला वाचवले आहे.
पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी गावागावांत बोअरवेल घेतले जातात. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे बोरवेल कोरडेठाक पडत आहेत. हे कोरडे पडलेले बोअरवेल झाकले जात नसल्याने, अशा दुर्घटना घडत आहेत. यातून सध्या पाण्याची असलेली गरज पाहता या दुर्घटना रोखण्यासाठी महसूल विभागाने वेळीच कडक पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी आंबेगाव तहसीलदारांच्या माध्यमातून संपूर्ण आंबेगाव तालुक्यात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सुषमा पईकर यांनी दिली आहे.
बोअरवेलमध्ये अडकलेला चिमुकला सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी पहाटेच्या सुमारास सांगितले. चिमुकल्याला प्राथमिक उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.