पुणे- मी ज्या ज्या जिल्ह्यात जात आहे तिथं मला महाविद्यालये कधी सुरू होणार हाच प्रश्न विचारला जात आहे. महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून अवाहल मागवला आहे. येत्या काही दिवसांत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय घेत असताना जे विद्यार्थी महाविद्यालयात येणार त्यांना कोरोनाची लागण होणार नाही, प्राध्यापक तसेच आमचे शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोरोनाची लागण होणार नाही, या सर्वांचा विचार करूनच महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरोना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ऑनलाईन परीक्षा
जे जे महाविद्यालय ऑनलाईन सुरू आहेत, त्या त्या महाविद्यालयात कोरोना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर परीक्षांचे स्वरूप कसे असावे याबाबत कुलगुरू आणि राज्यपाल यांच्याशी चर्च करून, निर्णय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी उदय सामंत यांनी म्हटले आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्राची पावती देखील ग्राह्य धरणार
विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असेल, आणि त्याला ते अद्याप मिळाले नसेल तर त्या अर्जाची पोहोचपावती देखील ग्राह्य धरली जाणार आहे. या पावतीच्या आधारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच जात पडताळणी प्रकरणात कोणी जाणीवपूर्वक विलंब करत असेल, तर त्याच्यावर कारवाई करू असा इशाराही उदय सावंत यांनी यावेळी दिला आहे.
कोणाचंही आरक्षण काढलं जाणार नाही
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की कोणालाही आरक्षण देत असताना कोणाचंही आरक्षण काढलं जाणार नाही. ही महाविकास आघाडीची भूमिका आहे. मंत्रिमंडळात ओबीसी विरुद्ध इतर असा कोणतंही वाद महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू नसल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.