पुणे- नगर-कल्याण महामार्गावर अवैध धंदा फैलावत चालला असताना डुंबरवाडी टोलनाक्यावर कस्टम डिपार्टमेंटच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. पथकाने अंदाजे दोन क्विंटल चरस, गांजा जप्त केला आहे. कस्टम विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बुधवारी ही मोठी कारवाई केली. कस्टमचे अधिकारी गेल्या एका महिन्यापासून संशयित वाहनावर नजर ठेवून होते. अखेर त्यांना यश आले आहे.
आरोपी आळेफाटाकडून कल्याणच्या दिशेने इनोव्हा गाडीमध्ये जात होते. तपास अधिकार्यांनी पाठलाग करत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. अधिकार्यांनी संशयित इनोव्हा गाडीला पुढील बाजूने दुसरी गाडी आडवी घालून जोरदार धडक दिली. यावेळी आरोपींनी गाडीतून उतरुण पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, डुंबरवाडी टोलनाक्यावरील स्थानिक मुलांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आले. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच कारवाईत इनोव्हा गाडीतून अंदाजे दोन क्विंटल चरस गांजा जप्त करण्यात आला.