पुणे - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तर मतदार राजाने कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले, याचा निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शहरातील रिमांड होम येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या आई प्रतिभा पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.