पुणे - चाकण औद्योगिक वसाहतीमधील बीरदवडी येथे एका वर्कशॉपमध्ये मालकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे. हरिश्चंद्र किसनराव देठे असे हत्या झालेल्या वर्कशॉप मालकाचे नाव आहे.
चाकणमधील बीरदवडी येथील व्ही.एच.डी. इंजिनिअरिंग नावाचे वर्कशॉप हरीश्चंद्र देठे चालवत होते. रोजच्या दैनंदिन वेळेप्रमाणे देठे वर्कशॉपमध्ये आले असताना वर्कशॉपच्या गेटवर एका व्यक्तीशी वाद झाला. त्यानंतर काही वेळात चार ते पाच जणांनी येऊन वर्कशॉपवर दगडफेक केली. दरम्यान, हरीश्चंद्र देठे वर्कशॉपच्या गेटवर येताच त्यांच्या डोक्यात दगड घालून निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर फरार आहेत. देठे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा - पुणे पोलिसांना मोठे यश, कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील 5 कोटी 73 लाख आणले परत
दरम्यान, चाकण औद्योगिक वसाहतीचा विस्तार झपाट्याने वाढत असताना एम.आय.डी.सीचे पाच टप्प्यांपर्यंत काम सुरू आहे. मात्र, एकीकडे एम.आय.डी.सीमध्ये कामगार, कंपनी मालक सुरक्षित राहिले नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. चाकण पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी दोन पथके तयार केली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली.
हेही वाचा - '...तर देवेंद्र फडणवीसांनी 'या' विक्रमाची बरोबरी केली असती'