पुणे - ग्रामीण भागातील शेतमाल व व्यापारीवर्गाला वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून मालवाहतुकीसाठी एसटी ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अगदी माफक दरात ही मालवाहतुकीची सेवा लवकरच कार्यरत करण्यात येणार असल्याची माहिती राजगुरुनगर आगाराचे व्यवस्थापक रमेश हांडे यांनी दिली आहे.
लॉकडाऊन व कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेतमाल व इतर वाहतुकीला शेतकरी व व्यापारी वर्गाला अडचणी येत आहेत. यासाठी एसटी महामंडळाकडून एसटीच्या मालवाहतूक गाड्यांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. पुढील सात ते आठ दिवसांत ही सेवा कार्यरत करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी व व्यापारी वर्गाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यवस्थापक रमेश हांडे यांनी व्यक्त केला.
एसटीची आता मालवाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी व इतर व्यापारी यांच्यासाठी ही सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, या मालवाहतुकीचे दर अजून निश्चित करण्यात आले नाही. मात्र, हे मालवाहतुकीचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे असणार असल्याचे राजगुरुनगर आगाराचे व्यवस्थापक रमेश हांडे यांनी सांगितले आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटीची सेवा पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे एसटीला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. सध्या काही ठिकाणी एसटीची तुरळक सेवा सुरू करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही.