खेड (पुणे) - खेडचे तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या बदलीसाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, त्यांनी त्यांचे काम निस्वार्थ तसेच चोखपणे केले आहे. त्यामुळे त्यांची बदली करु नये, तहसीलदारांना काम करण्याची संधी द्या,अशी मागणी करत खेड तालुक्यातील विविध संघटनांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना पत्राद्वारे पाठवत केली आहे.
मागील चार महिन्यांपासून कोरोनाच्या काळात प्रत्येक घटनास्थळांवर जाऊन तहसीलदार आमले या काम करत आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगार, आदिवासी भागातील नागरिक, धरणग्रस्त अशा प्रत्येकाला कोरोनाच्या काळात अन्न-धान्य, आरोग्य सेवा पुरविण्याचे काम यशस्वीरीत्या राबवले आहेत. चाकण परिसरातील 4 लाखांपेक्षा जास्त कामगारांना त्यांच्या गावी सुखरुप पोहचविण्यात त्यांच्या मोलाचा वाट राहिला आहे, असे त्या संस्थांनी सांगितले आहे.
खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरू स्मारक समिती, हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठान, बैलगाडा संघटना, महिलांसाठी काम करणारी चैतन्य संस्था आदी संस्थांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिले आहे. महिला तहसिलदार सुचित्रा आमले यांच्या कामाचा गौरव करून त्यांना पुढील काळात खेड तालुक्यात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
खेड तालुक्यातील काही राजकीय नेते स्वतः च्या स्वार्थापोटी आधिकारी वर्गाला बदनाम करून त्यांच्या बदलीचे प्रयत्न आहेत, असा आरोपही या संस्थांनी केला आहे. मात्र, ज्या आधिकाऱ्यांनी कोरोनाच्या काळात निस्वार्थ काम केले त्यांच्यावर राजकीय द्वेशातून बदलीची कारवाई होऊ नये, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. जर बदली झाली तर पुढील काळात आधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी आंदोलनाची लढाई उभी राहील, असा इशाराही या पत्रातून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात उपमुख्यमंत्री अजित पवार या अधिकाऱ्यांबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.