पुणे : पुणे शहर पोलीसांच्या कंट्रोल रुमला कॉल करून पुणे स्थानक या ठिकाणी दहशतवादी हल्ला होणार अशी खोटी माहिती आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने दिली होती. त्या व्यक्तीचा पुणे पोलिसांनी लगेच शोध घ्यायला सुरूवात केली होती. दरम्यान, तांत्रिक माहितीच्या आधारे कात्रज परिसरातून (पीएसआय भिडे व LCB)च्या पोलिसांच्या मदतीने या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव गोविंद भगवान मांडे (वय 32 वर्षे, मूळ गाव परभणी, सध्या कात्रज) असे आहे.
चुकून कॉल गेला असल्याची शंका : आरोपी काल रात्री मनमाड ते पुणे असा प्रवास करीत असताना, त्याच्या बोगीमध्ये पोलिसांसारखे दिसणारे दोन्ही इसमांनी त्याला विविध कारणावरून भांडण करत होते. त्यातून वाचण्यासाठी त्याने 112 क्रमांक कॉल केला होता. हा कॉल त्याने मनमाड येथून केला व तो चालू असताना त्याचे सोबत भांडण करणाऱ्या दोन्ही पोलिसांसारखे इसमानी, तो फोन काढून घेऊन आम्हाला दहशतवादी हल्ल्यांचे काम करायचे असते. आता आम्ही 142 किलोमीटर ते 150 किलोमीटर या ठिकाणी काम करणार आहोत असे त्याला बोलत होते. परंतु, कॉल चालू असल्याने तशीच माहिती नियंत्रण कक्षात प्राप्त झाली. आणि कॉल हा गैरसमजुतीत झाला असावा असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली : सध्या रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती सामान्य आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी रेल्वे स्टेशनला आलेल्या निनावी फोन संदर्भात तपास सुरू केला आहे. काल रात्री अज्ञात इसमाने फोन करून पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. ही धमकी मिळताच रेल्वे पोलीस अलर्ट झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लगेचच परिसराची पाहणी केली. रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचे प्रवाशांना कळाल्यानंतर प्रवाशांचीही घाबरगुंडी उडाली. रेल्वे पोलिसांच्या श्वान पथकाने संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
कोम्बिंग ऑपरेशन सुरू : पुणे शहरात आगामी होत असलेली अंतराष्ट्रीय जी-२० परीषद, त्याच प्रमाणे प्रजासस्ताक दिना निमीत्त कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी पुणे शहर पोलिसांकडून गेले काही दिवसांपासून शहरभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 72 गुन्हेगारांना यामध्ये अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
जी 20 परिषद : येत्या 13, 14 आणि 15 तारखेला जी 20 शिष्टमंडळाचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. त्यांचे पुणे विमानतळावर विमानतळ प्रशासनाकडून जंगी आणि पुणेरी पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली आहे. पुणे विमानतळावर जी 20 शिष्टमंडळाचे प्रतिनिधी विविध कंपन्यांच्या विमानांमधून उतरतील. ते उतरल्यावर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला या प्रतिनिधींचे औक्षण करून तिलक लावून स्वागत करतील. हे सर्व होत असताना सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी मोठे पावले उचलली आहेत.