पुणे - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केल्यानंतर पालखी आज (गुरुवारी) पुण्यात मुक्कामी आहे. भवानीपेठेतील पालखी तळावर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विसावली आहे. हजारो भक्त सकाळपासूनच पालखीच्या दर्शनासाठी रांगेत उभे असून सगळीकडे विठूनामाचा गजर सुरू आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवारी सायंकाळी सात वाजता पुण्यामध्ये आगमन झाले होते. त्यानंतर पुण्यामधील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम राहणार आहे. याप्रसंगी शहरामध्ये विविध सामाजिक आणि व्यावसायिक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आहेत. तर सुरक्षा आणि वाहतूक नियमनासाठी देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.