पिंपरी-चिंचवड - बैलगाडा श्रेयवादावरून रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. राष्ट्रवादी पक्ष असा आहे की शेजारांच्या घरी पाळणा हलला की हे पेढे वाटायला लागतात, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला ( Sadabhau Khot Criticized Ncp ) आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 2014 ला काँग्रेस, राष्ट्रवादी ने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली, असे देखील त्यांनी म्हटलं आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष असा आहे की, शेजारच्या घरी पाळणा हलायला लागला की ते पेढे वाटायला लागतात. राष्ट्रवादी, काँग्रेस ने 2014 ला बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणली. त्यावरील बंदी उठवण्याचा पहिला अध्यादेश माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काढला. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी विधायक आणलं होतं. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत निर्णय घेतला. उच्च न्यायलात शेतकऱ्यांची बाजू देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे यांनी मांडली. त्यांनी नेमलेल्या समितीचा रिपोर्ट ग्राह्य धरला, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली, असे खोत यांनी स्पष्ट केले.
पुढे त्यांनी म्हटले की, ऊसाला लागला कोल्हा ही म्हण आहे. ऊस आला की तिथ कोल्हा खायला जातो. बैलगाडा शर्यतीवरील बंदी, कोणी, कुणाच्या काळात आणली हे स्पष्ट करावं, अस आव्हान खोत यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं आहे. सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही सन्मान करतो. त्यांचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने स्थापन झालेल्या शिवसेनेने केला याचं दुःख महाराष्ट्रातील जनतेला आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.