पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणेकर मेट्रोच्या प्रतीक्षेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केल्यानंतर मेट्रो मार्ग पुणेकरांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात पुणेकर तसेच पिंपरी चिंचवडमधील नागरिक हे मेट्रोचा आनंद घेत आहेत. मेट्रो सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 96 हजार 498 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर यातून 16 लाख 42 हजार 860 रूपये एवढे उत्पन्न मिळाले आहे. पुणेकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात दोन मार्गिकांचा समावेश आहे. यात पहिली मार्गिका गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉलपर्यंत तर दुसरी मार्गिका ही फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आहे. एकूण 13 किलोमीटर लांबीच्या या दोन्ही मार्गिका आहे.
मेट्रोने होणार फायदे : दोन्ही मर्गिकांच्या उद्घाटनामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे हे मेट्रोद्वारे जोडली जोडण्यात आली आहेत. त्यामुळे लाखो पुणेकरांना याचा फायदा होणार आहे. दररोज पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. पण, आत्ता पिंपरी चिंचवड ते पुणे हा प्रवास 15 ते 20 मिनिटांत होणार आहे. आता एकूण 21 स्थानकांसह 23.66 किमीचे मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित झाले आहे. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी खूपच कमी होणार आहे.
तिकीट घेण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध : पुणे मेट्रोच्या वतीने प्रवांश्याच्या तिकिटासाठी विविध पर्याय उपलब्ध करण्यात आले आहे. यात प्रत्येक स्टेशनवर तिकीट खिडकी, तिकीट व्हेंटीमशीन, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, मेट्रो कार्ड, व्हॉट्सॲप तिकीट तसेच डिजिटल पेमेंट आणि सर्व युपीआय उपलब्ध झाले आहे.
कष्टकरी, कामगारांनी अनुभवली मेट्रो सफर : कष्टकरी, कामगार, सफाई कर्मचारी, भाजीविक्रेते अशा श्रमिक घटकांतील बंधू-भगिनींनी देखील पुणे मेट्रोची सफर अनुभवली आहे. बोपोडी ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट ते बोपोडी अशी मेट्रोची सफर केलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची भावना होती. माजी उपमहापौर सुनीता वाडेकर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातून बोपोडी भागातील कष्टकरी, श्रमिकांसाठी पुणे मेट्रोची सफर घडविण्यात आली. पहिल्यांदाच मेट्रोमधून प्रवास करताना खूप मजा आली. रोजच्या वाहतूक कोंडीतून एक आरामदायी आणि मोकळा प्रवास करता आला. सर्व सोयीसुविधा मनाला भावणाऱ्या आहेत. या अनोख्या भेटीबद्दल वाडेकर दाम्पत्याचे आम्ही आभार मानतो, अशी भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
हेही वाचा :
- Pune Metro: पुणे मेट्रोमध्ये तब्बल नऊ महिला पायलट, जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी यश
- Pune Metro Expansion: पुणे मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाचे 1 ऑगस्टला नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
- Pune Metro: मेट्रोच्या भूमिगत मार्गातून ट्रेनची चाचणी! भुयारी मार्गातून सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत मेट्रो धावली