पुणे - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारू दुकाने, बार सुरू केले. मात्र, नागरिकांची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे अद्याप बंद ठेवली आहेत. 'मंदिरे बंद अन् उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार…' अशी टीका भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यावेळी कीर्तन, टाळ मृदंगाच्या गजरात राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा - वृत्तवाहिन्यांना नियमावली देणारी वैधानिक संस्था अस्तित्वात का नाही - उच्च न्यायालाय
'संपूर्ण जगाला भक्तीचा आदर्श देणारा आपला पालखी सोहळा राज्य सरकारच्या सूचनेनुसार रद्द केला. प्रशासनाच्या आणि सरकारच्या निर्णयाचा प्रत्येक नागरिकाने आदर ठेवला. लॉकडाउन संपल्यानंतर पहिला निर्णय राज्य सरकारने घेतला तो दारूची दुकाने चालू केली. हॉटेल्स चालू झाली. बिअर बार चालू झाले. मात्र, मंदिरे उघडली तर, कोरोनाचा संसर्ग वाढेल, असा शोध राज्य सरकारने लावला आहे. त्याला भाजपाचा विरोध आहे. नवरात्रोत्सवापूर्वी राज्यातील मंदिरे खुली करावीत, या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत,' असे आमदार लांडगे या वेळी म्हणाले.
…तर भाजपाच्या रणरागिणी मंदिरांची कुलपे तोडतील - महापौर
महाविकास आघाडी सरकारने नागरिकांची श्रद्धास्थाने असलेली मंदिरं बंद ठेवली आहे. आता नवरात्रोत्सव येत आहे. या काळात महिला-भगिनींची व्रते असतात. पूजा करायची असते. मात्र, मंदिरेच बंद असल्यामुळे महिलांना नवरात्रोत्सव साजरा करता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यात आले आहेत. मग, मंदिरे बंद का ठेवली जात आहेत, असा सवाल उपस्थित करीत महापौर उषा ढोरे यांनी सरकारवर टीका केली. तसेच, मंदिरे उघडली नाहीत, तर भाजपाच्या रणरागिणी मंदिरांची कुलपे तोडून आत प्रवेश करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा - LIVE :'हे कसले हिंदुत्वाचे पुजारी, हे तर सत्तेसाठी लाचार', अशिष शेलारांची सरकारवर टीका