पुणे - तुरूंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनाही सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे. शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या हेतूने येरवडा कारागृहामार्फत केश कर्तनालय आणि इस्त्रीचे दुकान सुरू करण्यात आले आहे. कारागृहातील कैदी हे केश कर्तनालय चालवणार आहेत.
येरवड्याच्या खुल्या कारागृहात चांगली वर्तणूक करणाऱ्या कैद्यांना या केश कर्तनालायात संधी मिळणार आहे. याचे उद्घाटन पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी.पवार उपस्थित होते.
हेही वाचा - पुणे सनबर्न घातपात प्रकरणातील फरार आरोपी पश्चिम बंगालमध्ये जेरबंद
पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या कारागृहाच्या बाहेरील रस्त्यावर हे केश कर्तनालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी बाहेरील दरापेक्षा स्वस्त दरात सेवा मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकही या केश कर्तनालयाला पसंती देत आहेत.
या उपक्रमामुळे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना अनेक वर्षांनंतर बाहेरील जग पाहण्याची संधी मिळाली. या दोन्ही उपक्रमाच्या माध्यमातून सात ते आठ कैद्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांना सर्वसामान्यांमध्ये मिसळण्यासाठी मदत होणार आहे.
येरवडा कारागृहात अनेक कैदी आहेत. चांगल्या वर्तणुकीमुळे त्यातील काहींची खुल्या कारागृहासाठी निवड होते. मात्र, त्यांना बाहेर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते. त्यामुळे या कैद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. खुल्या कारागृहातील 45 कैद्यांना विविध उपक्रमांध्ये सामावून घेण्यात येत आहे. या उपक्रमातून या कैद्यांना रोजगार मिळणार आहे, तसेच शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर त्यांना स्वतःचा व्यवसायही सुरू करता येणार आहे, असे येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी सांगितले.