पुणे President Murmu Visit To NDA : राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यादरम्यान बोलत असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, मागील वर्षीपासुन एनडीएत महिलांचं देखील प्रशिक्षण सुरू झालंय आणि आज पहिल्यांदा या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये महिला कॅडेट्स सहभागी झाल्यात. त्यामुळं हा दिवस ऐतिहासिक आहे. तसंच मला विश्वास आहे की सर्व महिला कॅडेट्स देशाचं आणि एनडीएचं नाव पुढं घेऊन जातील. आजही मुलींना त्यांच्या आवडीचं करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि यामुळं या महिला कॅडेट्सना खूप खूप शुभेच्छा आहे. दरम्यान, यावेळी राज्यपाल रमेश बैस तसंच एनडीएचे विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते.
या संस्थेनं देशाला महान पुत्र दिलेत : "आज या युवा कॅडेट्सला बघून माझं हृदय गर्वानं भरलंय. या संस्थेनं देशाला महान पुत्र दिलेत. जे देश सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. तसंच ही प्रशिक्षण संस्था देशाच्या उत्कृष्ठ संस्थांपैकी एक आहे. येथून पास आऊट होणारे लोक देशाच्या सेवेसाठी तयार झाले आहे. भारताची शांती, स्थिरता, आणि समृद्धी यासाठी सीमेवरील आणि आंतरिक सुरक्षा महत्त्वाची आहे. पूर्वीपासून आपण 'वसुधैव कुटुंबकम्' या परंपरेला मानत आलो आहोत. परंतु आपली सेना देशाच्या अखंडतेला हानी पोहोचवणाऱ्या बाहेरील तसंच आतील शत्रूंशी सामना करण्यासाठी सदैव तयार आहे," असंही द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
लढाऊ विमानांनी वेधलं सर्वांचं लक्ष : दरम्यान, पहाटेच्या रम्य वातावरणात बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील 'क्वाटर डेक'चा दरवाजा उघडला. त्यानंतर या दरवाजातून लष्करी बॅण्डचं आगमन झालं. त्यापाठोपाठ अकादमीच्या कॅडेट्सच्या मैदानावर झालेल्या परेड्समुळं उपस्थितांच्या अंगावर शहारा आला. चेतक हेलिकॉप्टर, जॅग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं.
हेही वाचा -