पुणे - पुण्यातील वानवडी परिसरात सात फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या अवघ्या बावीस वर्षाच्या तरुणीचा रहस्यमय मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली की, तिची हत्या झाली, याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत. पूजा चव्हाणच्या मृत्यूमुळे मात्र राज्यातील राजकारण ढवळून निघाले. कारण, पूजाच्या आत्महत्येसाठी राज्याचे वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर ही पूजा चव्हाण कोण होती ? आणि तिने इतकं टोकाचं पाऊल का उचलले? या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडामोडी घडल्या याचा हा सविस्तर आढावा..
कोण आहे पूजा?
पूजा चव्हाणचे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण वसंत नगर तांडा येथे तर, पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण परळी येथील वैद्यनाथ विद्यालय येथे झालेले आहे. तिला शालेय जीवनापासून समाज सेवा आणि सर्वसामान्य व गरजू लोकांना मदत करायला आवडायचे. या आवडीतून तिने समाजकार्य हे क्षेत्र निवडले. सुरुवातीच्या काळात भारतीय बंजारा क्रांती दल या पक्षात पदार्पण केले. 2015-16 मध्ये तिला याच पक्षाचे युवती प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले. यानंतर ती राजकारणात सक्रिय झाली. पुढे तिने परळी शहरातील गरीब लोकांना मदत करत वसंतराव नाईक व सेवालाल महाराज यांच्या जयंतीमध्ये सहभागी होऊन समाज कार्य केले. प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या प्रचारातदेखील पूजा अनेक वेळा सहभागी झालेली आहे.
सोशल मीडियाचे वेड ते समाजकार्यात पुढाकार
बंजारा समाजातील असलेल्या पूजा चव्हाणचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील परळी होते. पूजाला सोशल मीडियाचे भलतेच वेड होते, हे तिचे इंस्टाग्रामवरील फोटो पाहून लक्षात येते. तिला स्टार व्हायचे होते. टिकटॉकवर ती स्टार झालीही. टिकटॉकवर तिचे फॅन फॉलोइंगही मोठे होते. सामाजिक कार्याचीही तिला आवड होती. त्यानुसार ती राहत असलेल्या परिसरातील वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभागी व्हायची. पुढे तिने राजकीय कार्यक्रमातही सहभाग घेतला.
पूजा स्पोकन इंग्रजीच्या कोर्ससाठी पुण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीनंतर सांगितले जात आहे. पूजाची स्वप्न मोठी होती आणि ही स्वप्न पूर्ण करायची तर आपल्याला इंग्रजी आले पाहिजे असे तिला वाटायचे. इंग्रजी आली तर जग जिंकता येईल, असे तिला सातत्याने वाटायचे. इंग्रजी आले तर समाजासमोर मोठा आदर्श निर्माण होईल आणि समाजाचा विकासही साधता येईल अशी तिची विचारसरणी होती. त्यामुळे इंग्रजीचे धडे घेण्यासाठी ती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परळीवरून पुण्याला आली, अशी माहिती सुरुवातीच्या तपासात समोर आली आहे. पण अचानक असे काय बिनसले की तिने आत्महत्या केली? की तिला कोणी असे करायला भाग पाडले, याची उत्तरे पोलिसांच्या चौकशीतून बाहेर पडतील.
आत्महत्या की हत्या? तपास सुरू
पूजाने महंमदवाडीतील हेवन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेतला होता. तेथे ती भाऊ आणि एका मित्रासह राहात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सर्वकाही सुरळीत चालू असताना तिने 7 फेब्रुवारीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. यात तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झालाय असं सांगण्यात येत आहे. परंतु, कसलाही त्रास नसताना पुण्यात इंग्रजी शिकण्यासाठी आली असताना पूजाने हे पाऊल का उचलले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ती कसली तरी ट्रीटमेंट घेत होती असेही सांगितले जात आहे. परंतु, ही ट्रीटमेंट नेमकी कशाची होती, हे अद्याप उघड झालेले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू एक कोडे बनला आहे.
दरम्यान, पूजाच्या मृत्यूसाठी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट नाव घेऊन संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत तब्बल 11 ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमधील संभाषण गंभीर असून त्याआधारेच संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे केली जात आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे. तर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घ्यावा आणि स्कॅन करून अधिक माहिती मिळवावी. त्याआधारे दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. पंकजा मुंडे यांनी देखील ट्विट करत पूजाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारावरून सरकारवर चहुबाजूंनी टीका होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष होते. यावर बोलताना ते म्हणाले, या प्रकरणात व्यवस्थित चौकशी केली जाईल. जे सत्य आहे ते बाहेर येईल. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे, त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात येईल. सत्य लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये, यामध्ये जे सत्य असेल ते चौकशीअंती जनतेसमोर आले पाहिजे.
महिला आयोगाचे पोलिसांना पत्र
राष्ट्रीय महिला आयोगानेही या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली. महिला आयोगाने पुणे पोलिसांना एक पत्र पाठवून चौकशी अहवाल देण्याची मागणी केली. तर पुणे पोलिसांच्या वतीने या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर आम्ही त्यांना अहवाल पाठवणार आहोत, अशी प्रतिक्रिया देण्यात आली.
पोलीस महासंचालकांचे चौकशीचे आदेश
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून पुणे पोलिसांवरही टीका होत असतानाच आता राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.