पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांकडून कडक संचारबंदी लागू केल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावून नाकाबंदी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगरात लाठ्यांचा प्रसाद दिला जात आहे. मात्र, सध्या पोलीस आयुक्तालयात मनुष्यबळ कमी असल्याने याचा संचारबंदीवर परिणाम होत आहे. त्यातच काही टवाळखोरांचाही सामना पोलिसांना करावा लागत आहे.
संचारबंदी काळात टवाळखोरांचा सामना-
संध्याकाळी 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी असून अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना संचार करण्यास बंदी आहे. त्या पार्श्वभूमीवर संचारबंदी काळात पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे काही टवाळखोर मनमानीपणे कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. अशाच काही टवाळखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनीही नियम मोडणाऱ्यांविरोधात लाठीचार्जचा पर्याय स्वीकारला आहे