बारामती- राज्यातील अग्रेसर असणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ५ लाख ५ हजार मे. टन ऊसाचे गाळप करत ५ लाख १८ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. माळेगाव आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्यांनीही अनुक्रमे सहा आणि पाच लाखाचे गाळप पूर्ण केले असून तीनही सहकारी साखर कारखान्यांचा हंगाम जोरदार सुरु आहे. कोरोना, अतिवृष्टी आणि लहरी हवामानाचा सामना करत पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी कारखान्यांचा साखर हंगाम सुरू आहे.
चालू हंगाम विविध कारणांमुळे अडचणीत सापडला असताना सोमेश्वरच्या प्रशासनाने योग्य नियोजन करत संपूर्ण गाळप करण्याचा निश्चिय केला आहे. बारामती, फलटण, पुरंधर आणि खंडाळा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याकडे जवळपास १२ लाख ऊस गाळपाचे आव्हान आहे. बैलगाडी, ट्रक्टर- ट्राली, ट्रक आणि बारा हार्वेस्टिंग मशिन यांच्या माध्यमातून ऊसाची तोड सुरु असून दररोज सरासरी सहा ते साडेसहा हजार मे.टन गाळप केले जात आहे. ऊसतोडणी, मुकादम व उस वाहतूक संघटना यांचा संप, करार करूनही अनेक ऊसतोडणी कामगार न आल्याने मजुरांचा निर्माण झालेला प्रश्न, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस अशा अनेक अडचणींवर मात करत जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. गेल्या दोन वर्षापासून तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. जिरायती भागात ही ऊसाचे प्रमाण मोठे आहे. अनेक साखर करखान्यांना कार्यक्षेत्रातील ऊस संपवण्यासाठी एप्रिल ते मे महिना उजाडणार आहे.
साखर कारखाने | एकुण गाळप मे.टन | साखर पोती(क्विंटल) | साखर उतारा |
सोमेश्वर | ५ लाख ५ हजार | ५ लाख १८ | १०. ३३ |
माळेगाव | ६ लाख ७ हजार | ६ लाख १६ | १०. ४८ |
छत्रपती | ५ लाख १८ हजार | ५ लाख १६ | १०. २७ |