पुणे - कोरोनाच्या संकटाचा सामना देशातील प्रत्येक नागरिक करत आहे. घरात बसणे हाच कोरोनावर उपाय असल्याने नागरिक घरात बसून आहेत, तर ग्रामीण भागातील शेतकरी शेतात काबाडकष्ट करतोय. मात्र मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला विक्रीसाठी बाजारपेठच नाही. योग्य बाजारभाव मिळत नसल्याने तरकारी माल शेतात पडून असल्याने मोठ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात सर्वाधिक भाजीपाला, तरकारी मालाचे उत्पादन घेतले जाते. या मालासाठी नारायणगाव, मंचर, चाकण येथील बाजार समितीत मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र सध्याच्या लॉकडाऊनमध्ये बाजार समितीचे बाजार बंद असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारा शेतमाल शेतात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे .
कोरोनाच्या संकटात मरावं की आर्थिक संकटाचा सामना करत किती दिवस जगावं, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. दुष्काळी संकटावर मात करत शेतकरी कसाबसा उभा राहिला. त्यानंतर खरीप हंगामात आवकाळी पावसाच्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्यातूनही कसाबसा मार्ग काढत शेतकरी उभारी घेत होता. सध्या कोरोनाचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर उभं राहिलं आहे. शेतात पिकवलेल्या शेतमालाला विक्रीसाठी बाजारपेठ बंद नसल्याने शेतातील माल शेतातच पडून आहे. त्यामुळे मोठ्या भांडवली खर्चातून उभी केलेली शेती आता कर्जबाजारी करणार असंच चित्र शेतकऱ्यांच्या समोर आहे.
शेतीबरोबर दुग्ध व्यवसायही संकटात....
शेतीत कधी पिकतंय तर कधी पिकलेले खपत नाही. त्यामुळे आर्थिक संकट डोक्यावर उभं राहू नये यासाठी शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणुन दुग्ध व्यवसाय करत आहे. मात्र सध्या दुधाचे दर निम्म्याने कमी केल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही खर्च भागत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतीबरोबर दुग्ध व्यवसायही संकटात आल्याने शेतकरी पुरताच अडचणीत आला आहे.