पिंपरी-चिंचवड (पुणे) : शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू केले असून, दिवसेंदिवस शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात 715 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे, 341 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, शहरातील रुग्णांची संख्या काही दिवस वाढतच राहील अशी प्रतिक्रिया महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर असून, एकूण 9 हजार 790 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. पैकी, 5 हजार 900 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील 211 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, महानगर पालिकेच्या रुग्णालयातील 3 हजार 109 जण सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत झालेला रुग्ण भोसरी (पुरुष,70 वर्षे) थेरगांव (पुरुष, 72 वर्षे) चिंचवड (पुरुष, 72 वर्षे) नेहरुनगर (पुरुष,84 वर्षे) पिंपरी (पुरुष,64 वर्षे) रहाटणी (स्त्री, 65 वर्षे) येथील रहिवासी आहेत.
आयुक्त म्हणाले, लॉकडाऊनचा हेतू हा आहे की, पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेऊन आयसोलेट करायचे. लॉकडाऊन केले नसते तर हे बाधित रुग्ण अनेक ठिकाणी फिरले असते. कोरोना संक्रमणाची चैन वाढत गेली असती. पुढील काही दिवस संख्या वाढणारच आहे अस ते म्हणाले.