पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. त्यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल सीबीआयच्या हाती लागलं आहे. ठाण्याजवळच्या समुद्री खाडीतून ते पिस्तूल शोधून काढण्यात सीबीआयला यश आले आहे.
नॉर्वेहून तब्बल सात कोटी ५० लाख रुपये खर्च करुन मागवण्यात आलेल्या डीप सी एक्सप्लोरर तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे पिस्तूल शोधले आहे. दाभोलकरांची २० ऑगस्ट २०१३ ला पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मारेकऱ्यांनी हत्येसाठी वापरलेले पिस्तुल ठाण्याजवळच्या खारगावमधे असलेल्या खाडीत टाकून दिले होते. डॉक्टर दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीत ही माहिती सीबीआयला दिली होती. मात्र, खाडीच्या खोल पाण्यात पिस्तुलाचा शोध घेणे सोपे नव्हते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआयला त्याबाबत सातत्याने धारेवर धरले जात होते. त्यामुळे खोल पाण्यात शोध घेण्यासाठी दुबईमधील एका कंपनीला काम देण्यात आले होते. या कंपनीने नॉर्वेहून मागवलेल्या यंत्राच्या सहाय्याने पाण्याखाली विशिष्ट प्रकारच्या मॅग्नेटच्या सहाय्याने पिस्तुलाचा शोध घेण्यात आला.
दाभोळकरांच्या हत्येतील आरोपींचे धागेदोरे कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कर्नाटकात झालेल्या एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी जोडले गेले होते. त्यामुळे कर्नाटक पोलीस आणि पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एसआयटीसाठी देखील तपासासाठी पिस्तुल सापडणे गरजेचे होते. त्यामुळे हे पिस्तुल शोधण्यासाठी जे नॉर्वेहून तंत्रज्ञान मागवावे लागले त्यासाठीचा साडेसात कोटी रुपयांचा खर्च सीबीआय, कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांनी एकत्रितपणे केला आहे.
हे पिस्तूल मागील महिन्यात खारगावमधील खाडीतून काढण्यात आले असून ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहे. हे पिस्तुल सापडल्यामुळे या चारही हत्या प्रकरणांच्या तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामधे डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांचा समावेश आहे. तर सारंग अकोलकर आणि विनय पवार हे फरार आहेत. इतर तीन हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे एकमेकांशी संबंध असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.