पुणे - चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवण्याची घोषणा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना सरकारचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया बंग यांनी दिली होती. त्यानंतर आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अभय बंग यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे.
'अभय बंग हे महान समाजसुधारक'
वडेट्टीवार म्हणाले, अभय बंग हे महान आणि जगव्यापी समाजसुधारक आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला आहे. त्यांच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील एकही व्यक्ती दारू, सिगारेट पीत नाही तंबाखू खात नाही. इतके महानकार्य त्यांचे आहे. त्यामुळे त्यांना सगळे काही बोलण्याचा अधिकार आहे, असे सांगताना त्यांना खोचक टोला लगावला. चंद्रपूरनंतर गडचिरोली जिल्ह्यातही दारूबंदी उठवण्यासाठी समिती नेमण्याची सूचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार यांच्या या सूचनेमुळे दारूबंदी विषयी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे, असे सांगताना त्यांनी वडेट्टीवार यांना चंद्रपूर आणि गडचिरोलीत कोट्यवधी रुपयांचा दारू व्यापार उभारायचा आहे, असा आरोप महाराष्ट्रभूषण डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला होता.
हेही वाचा-मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल