पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात मानसिक रुग्ण असलेल्या आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून आईसह दुसऱ्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुपाली गणेश गाढवे (वय-३५) असे मानसिक रुग्ण असलेल्या महिलेचे नाव असून त्यांच्यासह मुलगा गंधर्व याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गौरव गणेश गाढवे (वय-७ वर्ष) याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली गणेश गाढवे या मानसिक रुग्ण असून गेल्या ३ वर्षापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुपाली यांच्यावर डांगे चौक येथील डॉ. आर्या व बारामता येथील डॉ. सोळंखी यांच्याकडे उपचार सुरू आहेत. अशी माहिती पती गणेश गाढवे यांनी पोलिसांना दिली आहे. तसेच यापूर्वी देखील दोनवेळा रुपाली यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी पती कामाला गेले तेव्हा रुपाली यांनी चिखली परिसरातील विहिरीत मुलांसह उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात एका मुलाचा मृत्यू झाला असून आई आणि दुसऱ्या मुलाला वाचवण्यात नागरिकांना यश आले आहे. रुपाली आणि गंधर्व यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.