पुणे - पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक सैनिक हुतात्मा झाले होते. या हुतात्मा सैनिकांचे पुलवामात स्मारक उभारण्यासाठी एका मराठमोळ्या अवलीयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी 'जन्मभूमी ते कर्मभूमी' हा उपक्रम हाती घेतला आहे. हुतात्मा जवानांच्या गावातील स्मृतिस्थळावरील मातीचा वापर करून ते त्यांची कर्मभूमी असलेल्या पुलवामात स्मारक उभारणार आहेत. उमेश जाधव, असे या अवलीयचे नाव आहे.
मूळचे औरंगाबादचे असलेले उमेश जाधव सध्या बंगळुरू येथे वास्तव्यास आहेत. स्मारक उभारण्यासाठी लागणारी माती ते देशभरातील हुतात्मा जवानांच्या स्मृतिस्थळावरुन गोळा करणार आहेत. यासाठी देशातील २९ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेशाचा प्रवास ते करणार आहेत.
या उपक्रमाला त्यांनी ९ एप्रिलपासून बंगळुरू येथून प्रारंभ केला आहे. आतापर्यंत त्यांनी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा, पद्दुचेरी आणि महाराष्ट्र राज्यातील हुतात्म्यांच्या स्मृतिस्थळावरील माती गोळा केली आहे. पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलढाणा येथील हुतात्म्यांच्या स्मृतिस्थळावरील माती घेऊन आज ते पुण्यात आले होते. यानंतर मुंबईतून ते मध्यप्रदेशात जाणार आहेत. १४ एप्रिल २०२० रोजी पुलवामा हल्ल्याला १ वर्ष पूर्ण होईल. या दिवशी ही 'जन्मभूमी ते कर्मभूमी' यात्रा पुलवामा येथे पोहोचणार आहे. तेथे भारताच्या नकाशाच्या रुपात स्मारक तयार केले जाणार असून त्यासाठी २९ राज्यातून गोळा केलेल्या मातीचा वापर करण्यात येणार आहे.
यासंदर्भात बोलताना उमेश जाधव सांगतात की, या यात्रेच्या माध्यमातून आम्ही भारतीय एक आहोत. आम्ही कोणतीही जातधर्म मानत नाही. ही भावना लोकांच्या मनात जागविण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच हुतात्मा जवानांच्या पश्चात भारतीय नागरिक त्यांच्या कुटुंबीयांसोबत असतात, हा संदेशही या यात्रेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. उमेश जाधव हे स्वतः एक कलाकार आहेत. बंगळुरूमध्ये त्यांचे संगीत शाळा (म्युझिक स्कुल) आहे. पण हे सर्व सोडून त्यांनी हुतात्मा जवानांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. हे सर्व करत असताना अनेकांनी मला सहकार्य केले. तर काहींनी हेटाळणी केली. वेडा म्हणूनही हिनवले. पण आपले प्राण पणाला लावून देशाची रक्षा करणाऱ्या जवानांसाठी मी काहीतरी करतोय, ही बाब माझ्यासाठी पुरेशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.