बारामती - बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत होणार आहे. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सतीश मोघे यांनी दिली आहे. तसेच हा निर्णय शासनाच्या असाधारण राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे आदेशही त्यांनी आज दिले. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यास कोणाचा आक्षेप असेल, तर ३० दिवसांच्या आत लेखी आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहेत. प्राप्त आक्षेपाच्या स्वरूपावरून जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.
अशी असणार नगरपंचायतीची रचना -
माळेगाव बुद्रुक येथील सिटी सर्वे क्रमांक १ ते ३०.१५ या महसुली गावातील गट क्रमांक १ ते ७०८ तसेच येळेवस्ती महसुली गावातील १ ते २४६ गट यामध्ये समाविष्ट होणार आहेत. दरम्यान उत्तरेस माळेगाव खुर्द, उत्तर-पूर्वस कसबा, बारामती पूर्वेस मळद, दक्षिण-पूर्वस पाहुणेवाडी, दक्षिणेस शिरवली, खांंडज, दक्षिण पश्चिमेस धुमाळवाडी, पश्चिमेस पंधरे व पश्चिम उत्तरेस सोनकसवाडी, अशी या नगरपंचायतीच्या हद्दीची रचना असणार आहे. मागील अनेक दिवसांपासून माळेगाव ग्रामस्थांची नगरपंचायतीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणी यश आले आहे.
हेही वाचा - काश्मिरातील विजयानंतर गुपकर अलायन्सची बैठक, एकजुटीनं काम करण्याचा व्यक्त केला विश्वास