पुणे : राजकारणामध्ये शरद पवार हे खूप मोठे राजकारणी आहेत, मात्र त्यांचे हे राजकारण एका दिवसात तयार झाले नाही. त्यांनी अनेक वर्षापासून वेगवेगळी माणसे हेरली, त्यांना संधी दिली. त्यामुळे 83 व्या वर्षी सुद्धा शरद पवार मी नव्याने पक्ष उभा करणार असे म्हणतात. मग ही नेमकी माणसे कोण होती, याचे मोठे गूढ आहे. मात्र त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे शांतीलाल सूरतवाला हे एक दिग्गज नाव आहे. शांतीलाल सूरतवाला यांनी शरद पवारांना धोका देणाऱ्यांचे नावही राहणार नाही. त्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल केला. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी.
पुण्याचे पहिले अध्यक्ष, पहिले महापौर : शांतीलाल सूरतवाला म्हणाले मी पुण्याचा पहिला अध्यक्ष झालो, त्याच्या आधी महानगरपालिकेत आम्ही 14 नगरसेवकांनी त्यांच्याबरोबर काम करायचे ठरवले. 14 नगरसेवक एवढाच पक्ष होता, रस्त्यावर काहीच नाही. एकही बोर्ड नाही, एकही कार्यकर्ता नाही. उद्या मोर्चा काढायचा, निदर्शने करायची, पक्ष नव्हताच त्या वेळेला चौका चौकात 15 ते 20 मुलांच्या टोळक्यात जाऊन बसायचे. त्यांना हात जोडून पटवून द्यायचे, प्रेमाने सांगायचे, महाराष्ट्राच्या हितासाठी आपण राजकारणात आले पाहिजे. काही लोक म्हणायचे राजकारण बेकार आहे, आम्हाला राजकारणात यायचे नाही. त्या लोकांना राजकारण बेकार नाही, राजकारणातली माणसं बेकार आहेत. आपण राजकारणात आले पाहिजे, असे करून करून पटवून देत होतो.
हत्तीवरून साखर वाटप : लोकांच्या बैठका घेऊन तिथे शाखा काढली की त्यांच्यातला एक अध्यक्ष करायचा. त्यांच्यातले पाच माणसं पदाधिकारी करायचे. तिथल्या तिथे बसून आणि दुसऱ्या दिवशी निम्मे पैसे त्यांचे, निम्मे पैसे माझे असा एक पत्र्याचा बोर्ड तिथं राष्ट्रवादी शाखा क्रमांक एक अशी करून आम्ही पाटी लावायचो, अशा पाट्या लावत सुटलो होतो. मी पुण्यात जवळजवळ एका महिन्यात 160 ते 161 शाखा पुणे ते वडगावपर्यंत आम्ही स्थापन केल्या. पक्षाच्या कामाला सुरुवात झाली, पहिल्या वर्धापन दिन 161 शाखेतले पाच-दहा पोरं आली, तेव्हा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महानगर पालिकेपासून ते लाल महालापर्यंत हत्तीवरून साखर वाटप करण्याचा कार्यक्रम केला होता. ही सगळी माणसं त्या मिरवणुकीत होती. म्हणून मिरवणुकीला शोभा आली, नाहीतर मी आणि हत्ती दोघं साखर वाटप केले असं लोकांना दिसले असते. अशाप्रकारे पुणे शहरात पक्षाची वाटचाल सुरू झाल्याचे शांतीलाल सूरजवाला सांगतात.
शांतीलाल सूरतवाला पुन्हा होणार सक्रिय : शांतीलाल सूरतवाला यांचे आज वय 75 वर्ष आहे, परंतु त्यांनी आता पुन्हा सक्रिय राजकारणात काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या मित्राच्या सोबत महाराष्ट्र फिरून पक्ष उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पक्षाच्या अनेक आठवणी असून शरद पवार यांच्या सारखे दिग्गज नेतृत्व आहे. पुणे शहरात 92 ला नगरसेवक निवडून आले, त्यावेळेस मला एक फोन करून शरद पवार यांनी तुला महापौर करण्याचा निर्णय झाला आहे. तू कोण्या अपक्षाचा पाठिंबा घेण्यासाठी पाया पडू नको, असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांच्या झालेल्या अवस्थेबद्दल यातना : शरद पवार यांच्या झालेल्या अवस्थेबद्दल मात्र यातना होत असल्याचे शांतीलाल सूरतवाला यांनी स्पष्ट केले. या सगळ्यांचे मुख्य राजकीय गुन्हेगार नरेंद्र मोदी असल्याचा आरोप शांतीलाल सूरतवाला यांना वाटते. नरेंद्र मोदींचा शेवट मात्र गोड होणार नसल्याची प्रतिक्रिया शांतीलाल सूरतवाला यांनी दिली आहे. ज्यांना पक्षाने सर्व काही दिले, त्यांनी शरद पवार यांच्यासोबत धोका केला. अजित पवार स्वच्छ निर्मळ नेते, पण त्यांना सुद्धा फसवण्यात आले. त्यांची काही मजबुरी असेल म्हणून ते गेले असतील, असे सुद्धा शांतीलाल सूरतवाला यांनी म्हटले आहे. आमच्या वेळेस स्वार्थी राजकारण नव्हते, आज सर्व स्वार्थी राजकारण झाले. त्यामुळेच हे सगळे झाल्याचे शांतीलाल सूरतवाला यांनी स्पष्ट केले आहे.
माणूस म्हातारा झाल्यानंतर आपण घराबाहेर काढतो का : शरद पवार यांना होणाऱ्या वेदना लक्षात घेऊन शांतीलाल सtरतवाला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या घरातला माणूस म्हातारा झाला तर आपण त्याला घराबाहेर काढतो का, असा सवाल त्यांनी यावेळी केला. जर असे बाहेर काढले तर आपल्याला अटक होते, असा कायदा आहे. मग तोच न्याय का लागू होत नाही असे म्हणत त्यांनी अजित पवारांसह सगळ्याच नेत्यांना संतप्त प्रश्न विचारला. पक्ष पुन्हा उभा ठाकेल याची आम्हाला चिंता नाही, पण यांना लाजच वाटत नसल्याचे म्हणत त्यांनी छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांना सुद्धा टार्गेट केले आहे. आता शरद पवार महाराष्ट्र फिरणार आहेत. त्यांच्यासोबत मी सुद्धा महाराष्ट्र फिरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या एका शब्दावर राजकारणातून निवृत्त झालेले त्यांचे जुने मित्र सुद्धा आता सक्रिय होऊन त्यांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कदाचित म्हणूनच शरद पवारांना पक्ष उभा करण्यासाठी अशा माणसांची मदत असल्याने त्यांच्याबाबत सहानुभूती वाढत आहे.
हेही वाचा -